top of page

पुणे शहरात मास्टरस्ट्रोक कॅरम अकॅडमी लवकरच सुरू

पुण्याचे उपनगर असलेल्या कोंढवा बुद्रुक येथील ऊन्ड्री येथे लवकरच मास्टरस्ट्रोक कॅरम अकॅडमी सुरू होणार असून येत्या १० ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० वा. अकॅडमीचे उद्घाटन भारतीय कॅरम संघाचे प्रशिक्षक ज्येष्ठ खेळाडू सुहास कांबळी, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष व हवेली तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती सचिन घुले यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी ऑल इंडिया बॉक्सिंग असोसिएशनच्या पंच, परीक्षक व क्रीडापटू वैशाली चिपलकट्टी, श्री शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रकाश गायकवाड, आंतरराष्ट्रीय खेळाडू अनिल मुंढे, आंतरराष्ट्रीय खेळाडू अभिजीत त्रीपणकर , महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे सदस्य आशुतोष धोडमिसे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.


या संदर्भात झालेल्या पत्रकार परिषदेस जेष्ठ भारतीय कॅरम संघ प्रशिक्षक सुहास कांबळी, आंतरराष्ट्रीय खेळाडू अनिल मुंढे आणि अभिजीत त्रिपणकर, आय सी एफ कप फेडरेशन पॅनल अम्पायर संदीप अडागळे, मास्टर स्ट्रोक कॅरम अकॅडमीचे संचालक गणेश अडागळे, उपसंचालिका आशा भोसले आणि महाराष्ट्र कॅरम असोसिएशन चे सभासद आशुतोष धोडमिसे उपस्थित होते.


कॅरम हा खेळ सर्वपरिचित आहे तसेच हा खेळ घरोघरी असतो या खेळाचा लहान मुलां पासून ते जेष्ठ नागरिकांपर्यंत सर्व जण आनंद घेतात. परंतु हाच खेळ राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यावसायिक स्वरूपातही खेळला जातो या बाबत कुठेच जागरूकता दिसत नाही. कॅरम खेळामध्ये जिल्हास्तरीय राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर पदके प्राप्त करता येऊ शकतात तसेच आयपीएल सारखी कॅरम ची सुद्धा एक आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे म्हणून कॅरम या खेळाकडे मनोरंजन किंवा विरंगुळा या दृष्टीने न पाहता एक उत्तम व्यावसायिक क्रीडा प्रकार म्हणून मान्यता मिळणे गरजेचे असल्याचे मत या वेळी कांबळी यांनी व्यक्त केले.



महिला, पुरुष, जेष्ठ नागरिक आणि मुले मुली या अकॅडमीत येऊन खेळू शकतात पण याच बरोबर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडू म्हणून जर या खेळाला स्वीकारायचे असेल तर अकॅडमी मधे ६ ते २१ वयोगटातील मुला मुलींना खास राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंकडून शिकण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे गणेश अडागळे यांनी सांगितले. भोसले म्हणाल्या की, कॅरम हा खेळ महिला सुद्धा खूप उत्तम रित्या खेळतात जर योग्य मार्गदर्शन मिळालं तर या खेळात महिला सुद्धा प्रावीण्य मिळवू शकतील. त्यासाठी महिलांना काही खास सवलती अकॅडमी तर्फे दिल्या जातील.


कॅरम या खेळा मधे सुद्धा राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, स्विस लीग, आय सी एफ लीग, झोनल स्पर्धा, बेस्ट झोन आदी प्रकारच्या स्पर्धा घेतल्या जातात. त्या साठी अकॅडमी मधून खेळतानाची आसन स्थिती पासून ते हातात स्ट्रायकर पकडण्या पर्यंतचे सर्व मूलभूत तांत्रिक प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे संदीप अडागळे यांनी सांगितले.


शिवछत्रपती पुरस्कार विजेता योगेश परदेशी मुळे कॅरमचा भारतातील चेहरा बदलला आहे. योगेश परदेशी हा पुणे जिल्ह्यातील असून भारता कडून आंतरराष्ट्रीय पातळीवर कॅरम खेळा मध्ये जास्तीत जास्त पदके मिळवणारा हा एकमेव खेळाडू आहे. योगेश परदेशी हा कॅरम क्षेत्रातील खेळाडूं मध्ये पुण्याची शान आहे. असे पत्रकार परिषदेत बोलताना अनिल मुंढे यांनी सांगितले.

क्रिकेट सारख्या खेळाला जसा नावलौकिक मिळाला आहे तसा कॅरम हा खेळ अजूनही भारतात दुर्लक्षित राहिला आहे. त्यामुळे कॅरम खेळामध्ये उत्कृष्ट खेळाडू निर्माण व्हावेत असा मास्टर स्ट्रोक कॅरम अकॅडमीचा उद्देश आहे.


विनामूल्य शिबिर- कॅरम खेळामध्ये रुची उत्पन्न होण्यासाठी अकॅडमी तर्फे ३ ते १५ ऑगस्ट पर्यंत सकाळी ११ ते सायं ६ या वेळे मधे मुलांसाठी विनामूल्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

Kommentare


bottom of page